आता तरी प्रशासन जागे होणार का ?

मणियार कुटुंबियांचा सवाल
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 11, 2025 16:40 PM
views 262  views

कुडाळ : गेल्या शुक्रवारी शिरोडा-वेळागर दुर्घटनेत आमच्या कुटुंबातील सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो, हे दुःख मोठे आहेच. पण आमच्यासारखे आभाळाएवढे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये,  यासाठी शासन, प्रशासन, पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील धोकादायक समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड, माहिती फलक, वगैरे सारखी यंत्रणा उभारावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती या दुर्घटनेत ज्यांनी दोन जीव गमावले आहेत, त्या मणियार परिवारातर्फे ऍड. परवेझ मुजावर आणि सर्फराज नाईक यांनी शासन आणि प्रशासनाला केली आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ती दुर्घटना झाल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड सहकार्य केले पण पोलीस प्रशासन वगळता स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या पत्रकार परिषदेला ज्यांनी आपले मुलगे गमावले त्या मयत जाकीर आणि फरहानचे वडील देखील ऊपस्थित होते. 

गेल्या शुक्रवारी ३ ऑक्टोबरला बेळगाव येथील कित्तूर कुटुंब आणि त्यांचेच नातेवाईक असलेले पिंगुळी येथील मणियार कुटुंबीय हे फिरण्यासाठी शिरोडा-वेळागर येथील समुद्रकिनारी गेले होते. तिथे समुद्रात अंघोळ करत असताना मोठी लाट आली आणि त्यांच्या पैकी ७ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामध्ये पिंगुळी येयेथील मणियार कुटुंबीयांपैकी फरहान मोहम्मद मणियार (वय वर्ष २०) आणि जाकीर निसार मणियार (वय वर्षे  १३) यांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनेत स्थानिकांनी खूप सहकार्य केले. समुद्रात वाहून गेलेले मृतदेह किनाऱ्यावर आणण्यासाठी स्थानिकांची खूप मदत झाली. पण  प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही, अशी खंत मणियार परिवाराच्या वतीने ऍड. परवेझ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेवेळी सर्फराज नाईक, आसिफ नाईक, निसार मणियार ( मयत जाकीरचे वडील), मोहंमद मणियार (मयत फरहानचे वडील) अल्तमश शहा, शारीक शेख, रिझवान मणियार, फैजान  मणियार, तौसिफ जमादार, शेहनशहा मकानदार उपस्थित होते. 

ऍड. परवेझ मुजावर यांनी शिरोडा वेळागर येथे झालेल्या दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. गोव्याएवढेच पर्यटक येथे भेट देतात. त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या जीवाची काळजी घेणे जिल्हावासियांचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. जिल्ह्याला या पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून जास्तीतजास्त उत्पन्न सुद्धा मिळते. रोजगार उपलब्ध होतो. त्यांची काळजी प्रशासनाने केली नाही तर त्यासारखे दुःख नाही. आमच्या कुटुंबातील माणसे  समुद्रात उतरली त्यावेळी समुद्री तुफानाची माहिती देणारा कोणताच फलक किनाऱ्यावर नव्हता किंवा या धोक्यांबाबत माहिती देणारा कोणी शासनाचा प्रतिनिधी तिथे नव्हता. आमच्या कुटुंबातील सातजण त्या समुद्रात बुडाले. पण त्यांना वाचविण्यासाठी कोणतीही मशिनरी तिथे नव्हती. भगत बंधू,  सुरज आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोज अशा तेथील स्थानिक लोकांनी आणि मच्छिमार बांधवानी त्या पर्यटकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.  पण त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली कि याबाबतीत प्रश्न कोणतेही सहकार्य करीत नाही. दोरी, रबरी ट्यूब, इतर मशिनरी असे कोणतेच साहित्य प्रशासन उपलब्ध करून देत नाही.  त्या दिवशी तीन मृतदेह सापडले. रात्री उशिरा बारा-सव्वाबारा वाजता चौथा मृतदेह सापडला. तो मृतदेह पावणेदोन तास समुद्रात दिसत होता. पोलिसांना कळविले पण त्यांच्या काही अडचणीमुळे ते पोहचू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मोचेमाडला पाचवा मृतदेह मिळाला. त्याच वेळी एक मृतदेह समोर दिसत होता. त्याला किनाऱ्यावर आणण्यासाठी होडीची मागणी करण्यात आली. पण होडीची व्यवस्था झाली नाही. तो मृतदेह नजरेदेखत पुन्हा समुद्रात वाहून गेला. नंतर तो मृतदेह विद्रुप अवस्थेत रविवारी सापडला. जर वेळीच होडी किंवा मशिनरी उपलध झाली असती तर त्या मृतदेहाची विटंबना झाली नसती. योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करता आले असते. त्यामुळे वेळीच कोणतीच मदत न मिळाल्याने हे प्रकार घडल्याचे ऍड. परवेझ मुजावर यांनी सांगितले. 

ऍड. मुजावर पुढे म्हणाले, तिसऱ्या दिवशी रविवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सुद्धा घटनास्थळी आल्या होत्या.  त्याच वेळी सहावा  मृतदेह सापडल्याचे मच्छिमार बांधवांकडून समजले. गोपाळ बटा या स्थानिक मच्छिमाराला तो मृतदेह समुद्रात बराच आत दिसला. तो मृतदेह वाहून जाणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्यांनी स्वतः होडीची व्यवस्था केली आणि आम्हाला ते मृतदेह होता त्याठिकाणी घेऊन गेले. त्यासाठी अॅलन फर्नांडिस यांनी होडी दिली. संकेत तोरसकर  हा ती बोट, पोलीस  आणि नातेवाईकांना  घेऊन समुद्रात गेले. दोनतासाने तो मृतदेह हाती लागला.  पण येथे सुद्धा स्थानिकांनीच मदत केली. प्रशासनाची मदत झालीच नाही. सातवा मृतदेह केळूसच्या समुद्रात मिळला. अजित नाईक या मच्छिमार बांधवाने याची माहिती दिली. तिथे सुद्धा होडी मिळाली नाही. अखेर मच्छमार बांधवानी निवती पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला. या सर्व प्रक्रियेत पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. पण ते फक्त सोबत होते. पण स्थानिक प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत पुरवली नाही तर ते काय मदत करणार, असा सवाल ऍड. मुजावर यांनी उपस्थित केला. 

आम्ही भोगतोय इतरांना भोगू देऊ नका !

सिंधुदुर्ग जिल्हयात मनमोहक समुद्र किनारे आहेत. येथील समुद्र किनारे पर्यटकांना मोहात पडतात आणि पर्यटक समुद्रस्नानासाठी उतरतात. आणि माहिती नसल्याने अशा दुर्घटना घडतात. आमच्या कुटुंबावर जो आघात झाला आहे, तो कधीच भरून येणार नाही. पण अन्य कोणत्या पर्यटकांवर अशी वेळ येऊ नये यासाठी पुरेशी व्यवस्था प्रत्येक समुद्रकिनारी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ऍड. परवेज मुजावर यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी सिद्धेश परब यांनी आणि इतर मच्छिमार बांधवानी यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.   हे सगळे स्थानिक लोक करत होते. पण दुर्दैवाने प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य झाले नसल्याचे ऍड. परवेज मुजावर यांनी सांगितले. 

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सहकार्य नाही : सर्फराज नाईक 

घटना घडल्यावर आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे सर्फराज नाईक यांनी सांगितले. दुसऱ्यादिवशी त्यांनी आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर हि घटना घातल्यावर दुपारी वेंगुर्ले तहसीलदार शवविच्छेदनस्थळी आले. पण त्यांनी फक्त घटना कशी घडली याची माहिती घेतली. बाकी काही अपेक्षित मदत त्यांच्याकडून मिळाली नसल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. तहसीलदार यांनी आमच्या प्रशासनाने रात्री मृतदेह शोधून काढले असे सांगितल्यावर तुमच्या यंत्रणेतील कोणीच रात्री नव्हते याची जाणीव त्यांना पीडित कुटुंबीयांच्या  नातेवाइकानी करून दिली.  ते मृतदेह आमच्याच माणसांना दिसले. आम्ही पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पण शिरोडा आउटपोस्ट असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडे काहीच यंत्रणा नव्हती. ना स्पीड बोट ना लाईफ गार्ड. त्यामुळे यापुढे जिल्हयात येणाऱ्या पर्यटकांची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सर्फराज नाईक यांनी केली. आम्ही स्थानिक असून आम्हाला सहकार्य मिळत नाही तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत असा प्रकार झाला तर यांचे किती हाल होतील? असा सवाल त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर उपस्थित केला.