
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानाचे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडी शहरातील प्रजेच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने प्रजेसाठी १०० वर्षाहून अधिक काळापूर्वी स्त्रियांच्या प्रसुतीसाठी राणी जानकीबाई सुतिका गृहची (हॉस्पिटल) स्थापना केली. प्रजेला उच्च शिक्षण मिळावे यासाठी सहा प्राथमिक शाळा व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली. पूर्वी घोड्याच्या पागेच असलेले ठिकाण आताचे सावंतवाडी एसटी स्टँडची जागा संस्थानाने जनतेच्या सेवेला दिली. सकाळ, सायंकाळी आज मुले ज्या गार्डनमध्ये खेळतात, ती जागा संस्थानाने नगर परिषदेला उद्यानासाठी दिली. तर उभा बाजार येथील रघुनाथ मार्केटची जागा ही त्यांनी नगरपालिकेला दिली. सावंतवाडी शहराचे निसर्ग रम्य मोती तलावाची प्रॉपर्टीसुद्धा संस्थानाची आहे. अशा कित्येक गोष्टी संस्थानाने या शहरासाठी दिल्या.
त्यांच्या अविस्मरणीय कर्तृत्वाची ओळख प्रत्येकाला व्हावी, म्हणून त्यावेळच्या सत्तेत असलेल्या नगरध्यक्षांनी नगरपरिषदेत ठराव मांडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, तलावाच्या काठी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचे भव्य असे पुतळे उभारण्यात आले. सदरचे पुतळे शहरवासीयांसाठी स्फूर्ती व आकर्षणाचा भाग बनले. मात्र आताच्या युगामध्ये सदरचे पुतळे सेल्फी पॉईंट बनले आहेत.
परंतु सद्द:स्थितीत या पुतळ्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात एकेकाळी १९२८ च्या जवळपास २९ वर्षे सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले व राणी जानकीबाई सुतिका गृहमध्ये रुग्ण सेवा बजावणारे स्व. डॉ. भाऊसाहेब परुळेकर यांचे ज्येष्ठ पुत्र अनिल परुळेकर यांनी मुख्याधिकारी जावडेकर यांची भेट घेतली आणि बापूसाहेब महाराजांनी या शहरावर कशाप्रकारे उपकार केले आहेत? याची माहिती देताना ते अतिशय भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. आज पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या पुतळ्यांच्या दुरावस्थेबाबत त्यांनी आपली व्यथा मांडली.
त्यानंतर मोती तलावाच्या काठी बसवलेल्या पुतळ्यांच्या (डागडूजी व इतर त्या आजूबाजूच्या रंगरंगोटी) संदर्भात मुख्याधिकारी जावडेकर व परुळेकर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. सदर पुतळा (ब्राँझ) पंचधातूचा असल्याकारणाने त्यावर पेंटिंग करून काही उपयोग होणार नाही, असे मत नगरपरिषदेचे इंजिनिअर कुडपकर यांनी मांडले. त्यावर जावडेकर म्हणाले, सदर धातूच्या पुतळ्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती घेऊन तशाच प्रकारे त्यावर लवकरात लवकर काम चालू करणार अशी ग्वाही मुख्याधिकारी जावडेकर यांनी अनिल परुळेकर यांना दिली. यावेळी नगरपरिषदेचे इंजिनिअर कुडपकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव हे उपस्थित होते.