पुण्यभूमी दुमदुमली !

Edited by: भरत केसरकर
Published on: December 27, 2023 10:53 AM
views 98  views

कुडाळ : 'दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या  जयघोषात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी माणगाव दत्त मंदिर येथे दत्त जन्म सोहळा संपन्न झाला. दत्त जयंती निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. विश्वस्त मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे गर्दी असूनही भाविकांना दर्शनासह तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेता आला. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत श्रींचा जन्मसोहळा संपन्न झाला.
     
सकाळपासून श्री दत्त जयंती उत्सवाला माणगाव येथील श्री दत्त मंदीरात सुरूवात झाली. सकाळी अखंड नामस्मरण समाप्तीनंतर अभिषेक महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. विश्वस्त मंडळ, भाविक, स्वयंसेवक आणि पोलीस यंत्रणेमुळे गर्दी असूनही दर्शनासाठी योग्य नियोजन असल्याने भाविकांना दर्शनाचा सहज लाभ घेता आला. दुपारी पुराण वाचन त्यानंतर ह.भ.प. पुरुषोत्तम पोखरणकर यांच्या सुश्राव्य कीर्तनातून जन्म  सोहळ्याची माहिती भाविकांना देण्यात आली. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत आणि दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात माणगावनगरी दुमदुमली. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन नामस्मरणात सहभाग घेतला. त्यानंतर रात्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी निलेश मेस्त्री आणि सहकारी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज बुधवारी श्री दत्त मंदिरामध्ये अभिषेक महापूजा लघु रुद्राभिषेक दुपारी आरती तीर्थप्रसाद महाप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता पुराण वाचन त्यानंतर आरती श्रीं चा पालखी सोहळा व ललिताचे कीर्तन व त्यानंतर दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.