१६ नोव्हेंबरला देवगडमध्ये 'पुणेरी पहाट'..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 13, 2023 13:37 PM
views 125  views

देवगड : कोकणात दिवाळीनिमित्त सकाळी कार्यक्रम सादर करण्याची फारशी परंपरा नाही मात्र ती परंपरा सुरू होऊन कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने देवगड मध्ये भाई बांदकर यांनी 16 नोव्हेंबर रोजी देवगड मध्ये “पुणेरी पहाट” या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

भाई बांदकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली यावेळी संजय धुरी उपस्थित होते. पुणेरी पहाट हा कार्यक्रम देवगडचे नामवंत कलाकार सादर करणार आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पहिली दिवाळी पहाट केलेले भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून व लेखनातून ही पुणेरी पहाट उलगडणार आहे. देवगड मध्ये विविध पैलूचे कलाकार आहेत त्यांना पारखून गायन-वादनाची संधी देणे हाच मुळ उद्देश या कार्यक्रमाचा आहे. विविध गाण्यांची सुसूत्रता साधत नृत्य, संवाद व निवेदनाचा मेळ घालून कार्यक्रमाची बांधणी केली आहे. सुरवातीलाच नारद या कार्यक्रमाची उकल करतो.

दिवाळी पहाट म्हटले की भक्तीगीत व नाट्यगीतांचा संथपणे चालणारा कार्यक्रम अशी लोकांची धारणा झाली आहे पण आम्ही ही लोकांची धारणा मोडीत काढीत आहोत. तरुणाईपासून जेष्ठ नागरिक या सर्वांना आवडेल अशा सर्व प्रकारच्या गाण्यांचा समावेश केला आहे. गीत, संगीत, नृत्य, निवेदन, नेपथ्य, आकर्षक व आवश्यक लाईट व्यवस्था ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य कार्यक्रम प्रवेश विनामुल्य आहे या कार्यक्रमाला येण्यासाठी आ. नितेश राणे यांच्या सहकार्यातून शिरगाव ते जामसंडे, विजयदुर्ग ते जामसंडे व आचरा या भागातून एस.टी.च्या बस पहाटे पाच वाजता सुटणार आहेत. तालुक्यातील प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असला तरी याची प्रवेशिका घेणे गरजेचे असून आपल्या नजीकच्या कुठल्याही बँकेत जाऊन प्रवेशिका मागून घेऊ शकता.