
दोडामार्ग : आदर्शगाव संकल्प व प्रकल्पाअंतर्गत केर गावची निवड करण्यात आली आहे या अनुषंगाने गावाच्या प्रगतीचा अहवाल जाणून घेण्यासाठी पुणे येथील विशेष टीम केर येथे गुरुवारी दाखल झाली. आदर्शगाव संकल्प व प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेली कामे याची सविस्तर माहिती त्यांनी घेऊन गावविकासात महत्वाच्या कामाना गती कशी द्यावी याचे मार्गदर्शन ग्रामपंचायत प्रतिनिधी, आदर्शगाव समिती, संस्था प्रतिनिधी यांना केले.
ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्ली कार्यालयात ही विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी आदर्श गाव समितीचे उपसंचालक वसंत बिनवडे, जिल्हा तांत्रिक अधिकारी आप्पासाहेब पाटील, तांत्रिक अधिकारी श्री. शिंदे यांसह सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, ग्रामकार्यकर्ता तुकाराम देसाई, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, बचत गट सी आर पी उत्कर्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य यशवंत देसाई, ग्रामसेविका सोनिया नाईक, कृषि अधिकारी श्री. खडपकर, संजीवनी बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती कृषि आयुक्तालय पुणे येथील तांत्रिक चमू गावभेटीसाठी केर येथे आदर्शगाव योजने अंतर्गत सक्रिय गावांचा प्रगती अहवाल, वितरित निधी खर्च अहवाल व खर्च करण्याचे नियोजन याकरणाच्या अनुषंगाने ही भेट होती. या चमूने आदर्शगावाचा अहवाल जाणून घेतला त्यानंतर त्यांनी सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली.