देवदत्त परुळेकर 'मुळातून माणूस’ पुरस्काराने पुण्यात होणार सन्मानित

Edited by:
Published on: April 20, 2026 11:35 AM
views 37  views

पुणे : माणसातील माणुसपण जपणाऱ्या आणि संवेदनशीलतेने समाजाशी संवाद साधणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘सारद मजकूर’तर्फे दिला जाणारा ‘मुळातून माणूस’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ निरूपणकार, लेखक, साहित्यिक आणि विचारवंत देवदत्त परुळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानवी मूल्ये जपण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

“माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा आगळावेगळा उपक्रम समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचा प्रयत्न करतो. मृदू आवाज, मृदू स्वभाव जपत संवेदनशीलतेने जगणाऱ्या आणि माणूस असण्याची भूमिका ठामपणे निभावणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे गौरवण्यात येते.

हा सोहळा सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे. कार्यक्रमात परुळेकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी अमृता आणि अभिजित हे संवादक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन तेजस्विनी गांधी करणार असून उपस्थितांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

देवदत्त परुळेकर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात निरूपणकार, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे माध्यम क्षेत्रात लेखन करताना सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, संत साहित्यिक विषयांवर परखड व संवेदनशील लेखन केले आहे. त्यांच्या लेखनशैलीत स्पष्टता, अभ्यासू दृष्टीकोन आणि मानवी मूल्यांची जाणीव ठळकपणे दिसून येते.

परुळेकर यांनी विविध वृत्तपत्रे व माध्यमसंस्थांमध्ये लेखन, स्तंभलेखन करतांना सार्वजनिक व्याख्यानांमधून त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीव, विवेकशीलता आणि मानवी नात्यांची उब यांचा ठसा उमटतो. या पुरस्काराच्या निमित्ताने समाजात माणुसकीच्या मूल्यांचा पुनरुच्चार होत असून, देवदत्त परुळेकर यांचा हा सन्मान हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून मानवी संवेदनशीलतेचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.