राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेत केंद्रशाळा सुकळवाडच्या विद्यार्थ्यांचे यश

द्वितीय क्रमांक पटकावला
Edited by:
Published on: March 22, 2026 11:54 AM
views 63  views

सिंधुदुर्ग : दि.16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर करण्याचे आव्हान देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि उत्कृष्ट टीमवर्कच्या जोरावर हे यश संपादन केले.

या स्पर्धेत कु.आर्यन केशव भिसे, कु. तन्मय राजकुमार विश्वकर्मा आणि कु. रुद्र राकेश बांदल या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत परीक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रकल्प हा समाजोपयोगी, नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. समस्या ओळखणे, त्यावर उपयुक्त उपाय सुचवणे आणि प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टता सिद्ध केली. या यशामागे मार्गदर्शक शिक्षक मधुकर रामचंद्र  बाचीपळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबींसह प्रकल्प नियोजन, सादरीकरण कौशल्य आणि टीमवर्क याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभाग घेतला.तसेच शाळेचे पदवीधर शिक्षिका श्रीम.आस्मा तांबोळी मॅडम यांनी विध्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येतो याची जाणीव झाली. या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आहे.

२१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने ‘राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धा २०२५-२६’ घेण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आणि ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. याप्रसंगी एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ आणि ‘लीडरशिप फॉर इक्विटी’चे संचालक दीपक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यात अरुणा यादव, दीपली जोगदंडे, डॉ. सतीश सातपुते यांच्यासह ३४ जिल्ह्यांतून आलेले शिक्षक, विद्यार्थी आणि ‘एलएफई’चे सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष जीवनातील अडचणी पेलण्याची वृत्ती विकसित होण्यासाठी बळ मिळाले आहे. राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धेच्या या उपक्रमाचा राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ४८ हजार विद्यार्थ्यांना लाभ झाला. उपाय शोधणे हाच या हॅकथॉनचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकातील कौशल्ये आणि उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासाठीचे हे व्यासपीठ आहे.

समस्या सोडवण्याची क्षमता, नवोपक्रमशीलता आणि २१व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यावर या उपक्रमाचा भर आहे. या यशाबद्दल बोलताना मार्गदर्शक बाचीपळे सर म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्येवर तांत्रिक उपाय शोधण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला असून भविष्यात ते मोठ्या स्पर्धांमध्येही यश मिळवतील." विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेचे व जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल झाले आहे. सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.