
सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र, राजन तेलींसाठी जेवढी मेहनत त्यांनी घेतली तितकी अर्चना घारेंना तिकीट मिळण्यासाठी घेतली असती तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो असे विधान शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा बंडखोर उमेदवार अर्चना घारे समर्थक पुंडलिक दळवी यांनी केले आहे. हीच धडपड प्रवीण भोसलेंनी पक्षवाढीसाठी केली असती तर ते हीताच ठरलं असतं असंही ते म्हणाले.
दळवी म्हणाले, अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांच्या रुपाने सावंतवाडी मतदार संघात एक महिला उमेदवार रिंगणात आहे. त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून विरोधक हैराण झाले आहेत. त्यामुळे ते टीका करीत सुटले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता गेली अनेक वर्षे आमच्या सोबत असलेल्या माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी पक्षवाढीसाठी धडपड करण आवश्यक होते. जेवढी धडपड ते राजन तेलींसाठी करत आहेत तेवढी अर्चना घारे यांना तिकीट मिळण्यासाठी केली असती तर आम्ही त्यांना डोक्यावर घेवून नाचलो असतो. आज आमच्यावर टीका करणारे भोसले हे अर्चना घारेंनाच तिकीट मिळणार, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार, मी त्यांचे नाव सुचविले आहे असे वारंवार सांगत होते. मात्र, अचानक असे काय झाले की त्यांची भूमिका बदलली ? असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे.