स्नेहा कदम यांच्या 'शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून' काव्य संग्रहाचे प्रकाशन

Edited by: विनायक गावस
Published on: June 12, 2023 15:34 PM
views 101  views

सावंतवाडी : युवा कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या 'शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून' या त्यांच्या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. स्नेहा कदम या प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांच्या कन्या असून बालपणातच त्यांना साहित्याचा, सामाजिक चळवळीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा आढावा त्यांनी आपल्या कवितेतून सादर करून संवेदनशील कवयित्री म्हणून लौकीक प्राप्त केला आहे. शिवाय त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

" शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून' हा त्यांचा प्रथम काव्यसंग्रह असून 'हैकर्स पब्लिकेशन, मुंबईने' तो प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष सुनिल हेतकर यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत  करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. सीमा हडकर, राजेश कदम आदी मान्यवर व काव्यसंग्रहावर चर्चा केली. ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार प्रा. प्रविण बांदेकर यांचा विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला व काव्यसंग्रहाला मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार उर्मिला पवार, प्रा. आशालता कांबळे, ज. वि. पवार, प्रा. प्रदीप ढवळ, वीरधवल परब, उषा परब या थोर साहित्यिकांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कवी विठ्ठल कदम, कल्पना बांदेकर,  सम्यक साहित्य संसदेचे सचिव प्रा. सिद्धार्थ तांबे, स्नेहा कदम सम्यक साहित्य संसद मित्रपरिवार आदी उपस्थित होते.