स्नेहा कदम यांच्या काव्य संग्रहाचे रविवारी प्रकाशन

Edited by:
Published on: June 08, 2023 15:01 PM
views 330  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या युवा कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या 'शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून' या त्यांच्या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवार दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या साहित्यिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सम्यक साहित्य संसद परिवार व स्नेहा कदम कुटुंबियांनी केले आहे.


कु. स्नेहा कदम या प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांच्या कन्या असून बालपणातच त्यांना साहित्याचा, सामाजिक चळवळीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा आढावा त्यांनी आपल्या कवितेतून सादर करून संवेदनशील कवयित्री म्हणून लौकीक प्राप्त केला आहे. शिवाय त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.


" शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून' हा त्यांचा प्रथम काव्यसंग्रह असून 'हैकर्स पब्लिकेशन, मुंबईने' तो प्रकाशित केला आहे. सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष सुनिल हेतकर यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रित मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.


यावेळी प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. सीमा हडकर, राजेश कदम आदी मान्यवर व काव्यसंग्रहावर चर्चा करणार असून ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार प्रा. प्रविण बांदेकर व मान्यवर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला व काव्यसंग्रहाला मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार उर्मिला पवार, प्रा. आशालता कांबळे, ज. वि. पवार, प्रा. प्रदीप ढवळ, वीरधवल परब, उषा परब या थोर साहित्यिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक तथा सम्यक साहित्य संसदेचे सचिव प्रा. सिद्धार्थ तांबे, सम्यक साहित्य संसद मित्रपरिवार व स्नेहा कदम परिवार यांनी केले आहे.