
सावंतवाडी : सावंतवाडी येथील कवयित्री स्वप्ना गोवेकर लिखित ‘काव्यरंग’ कवितासंग्रहाचे प्रकाशन एसटी महामंडळाचे निवृत्त अधिकारी प्रकाश गोवेकर यांच्या हस्ते कुडाळ येथे छोटेखानी कार्यक्रमात नुकतेच झाले. यावेळी ॲड. राजीव बिले, मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे, पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. सुभाष गोवेकर, विकास गोवेकर आदी उपस्थित होते.
ॲड. राजीव बिले म्हणाले की, नवकवयित्री स्वप्नाचा हा काव्यसंग्रह केवळ मनोरंजन करणारा नसून मनात वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे नाजूक हेलकावे निर्माण करणारा आहे. भरत गावडे म्हणाले की, स्वप्नाच्या कविता या सृजनशील मनाचा हुंकार आहेत. माणसाचे भावविश्व जणू तिने शब्दांत मांडले आहे. प्रा. सुभाष गोवेकर म्हणाले की, मानवी जीवनाच्या अनेकविध कंगोऱ्यांना लडीवाळपणे स्पर्श करण्यात या सर्व कविता यशस्वी होतात.
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ‘काव्यरंग’ प्रकाशनाचा हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. विकास गोवेकर यांनी आभार मानले. पतंजली योग समिती, सावंतवाडी, भारत स्वाभिमान न्यास, निवृत्त कर्मचारी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, मराठी अध्यापक संघ, कळसुलकर माजी विद्यार्थी बॅच २००३, तसेच को.म.सा.प. सावंतवाडी, अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्यावतीने स्वप्ना गोवेकर यांच्या काव्यसंग्रहास शुभेच्छा देण्यात आल्या.