तळवडेत बचतगटांना कोंबडीची पिल्ले - शेळ्या प्रदान !

मंत्री केसरकर यांची उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: March 06, 2024 08:15 AM
views 109  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन आणि शेळीगट पालन या योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तळवडे पंचक्रोशीतील महिलांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप कार्यक्रम शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला. सुरुवातीच्या टप्प्यात २८०० महिलांना कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात येणार आहेत. त्याशिवाय शेळी गटही वाटप करण्यात येणार आहे.


या प्रसंगी मार्गदर्शन करताना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे, जेणेकरून पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा ‘हॅप्पी एग’ म्हणून ओळखला जाईल. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा ते बांदा योजनेअंतर्गत देण्याची ग्वाही दिली. बाजारपेठेमध्ये बकऱ्याच्या मटणाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेळीपालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येईल. रत्नसिंधू योजनेअंतर्गत या ठिकाणी असलेल्या आंबा-काजू बागायतीमध्ये दहा खोल्या काढून तिथे रेस्टॉरंट सुरू केल्यास शासनामार्फत दहा लाखापर्यंत अनुदान मिळेल. त्यासाठीही युवकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी तळवडेच्या सरपंच विनिता मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्री खरे, सहाय्यक उपायुक्त डॉ. संसारे, निलेश रेड्डी, शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, रत्नसिंधू योजनेचे सदस्य सूरज परब, रवी परब, जालिंदर परब, गुणाजी गावडे, योगेश नाईक, साईप्रसाद राणे आदी उपस्थित होते.