बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा गाडी द्या ; ठाकरे गटाने वेधलं मंत्री केसरकरांच लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 16:43 PM
views 79  views

सावंतवाडी : बांदा ग्रामपंचायत जवळ सद्यस्थितीत असलेल्या कचरा गाडीमध्ये वारंवार बिघाड होत असतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या नागरिकांना भेडसावते. याची दखल घेत आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख (ठाकरे गट) साई काणेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य रिया येडवे, देवल येडवे यांनी केली आहे.


सावंतवाडी येथे भेट घेत बांदा शहरातील समस्या मंत्री केसरकर यांना सांगितली. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तसेच कचरा व्यवस्थापन नियोजनबद्ध करण्यासाठी अजून एका स्वतंत्र कचरा गाडीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत असलेल्या गाडीमध्ये बिघाड होत असतो. परिणामी याचा नाहक त्रास व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अजून एका गाडीची आवश्यकता असल्याचे साई काणेकर यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा गावातील कचरा गाडी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती श्री. काणेकर यांनी दिली.