
सावंतवाडी : जगभरातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला विधायक पत्रकारिता कशी असावी ? याचा आदर्श देणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे आज जगभरात प्रचंड जाळे असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' संघटनेच्या विविध उपक्रमांचा नक्कीच सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार सावंतवाडीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी काढले.
'व्हॉईस ऑफ मीडिया' सिंधुदुर्ग आणि 'कोकण कला व शिक्षण विकास संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारांच्या पाल्यांसाठी आयोजित शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून श्री. परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे तसेच कोकण व कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी प्रथमेश सावंत आदि उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथींचे स्वागत व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग टीमच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक संजू परब पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांना खऱ्या अर्थाने एखादी बातमी करत असताना ज्या ज्या प्रवासातून जावे लागते ते मी माझ्या राजकीयआणि सामाजिक जीवनात अनुभवत आहे. मात्र हे सगळे करत असताना व्हॉईस ऑफ मीडियाने आपला एक स्वतःचा दर्जा कायम राखला याबद्दल संघटनेचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते.
यावेळी उपस्थित डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, ॲड. सिद्धार्थ भांबुरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते विक्रांत सावंत यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात नुकताच पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. भक्ती गांवस - तावडे, रील स्टार साईश सीताराम गावडे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सौ. चैताली नयनेश गावडे आणि दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या रेश्मा संदेश पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार विनायक गांवस यांनी तर आभार संघटनेचे कार्याध्यक्ष भूषण सावंत यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव शैलेश मयेकर, सहसचिव संजय पिळणकर, कार्याध्यक्ष आनंद धोंड, भूषण सावंत, उपाध्यक्ष अमित पालव, मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, महिला जिल्हाध्यक्षा पूनम राठोड, संघटक समीर म्हाडेश्वर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, सदस्य नयनेश गावडे, साबाजी परब, शुभम सावंत, पत्रकार नाना धोंड, अक्षय धुरी, नितिन गावडे यांसह व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.