
सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चांगली आरोग्य सेवा मिळत नाही 250 कंत्राटी कर्मचारी विविध पदावर कार्यरत असल्याचे दाखवून, प्रत्यक्षात 150 कर्मचारी कामावर असतात. कर्मचाऱ्यांच्या केवळ सह्या दाखविल्या जात असल्याचा आरोप करत वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुधारा 20 जून पर्यंत आयुक्तांची बैठक आयोजित करा. अन्यथा 21 जून रोजी वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन शेडण्यात येईल. असा इशारा ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता यांना दिला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाही. त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी बुधवारी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह राजन तेली, सतीश सावंत, परशुराम उपरकर, अमरसिंह सावंत, सुशांत नाईक आदींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत दवंगे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता 240 कंत्राटी कर्मचारी विविध पदावर भरलेले आहेत.असे असताना प्रत्यक्षात 150 कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले. तर अन्य शेकडो कर्मचाऱ्यांच्या केवळ सह्या मारलेल्या दिसून आल्या. याबाबत जाब विचारत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पगार द्या. मस्टरवर कंत्राटी कर्मचारी दाखवून 57 लाख रुपये ठेकेदाराला दिले जातात. केवळ मस्टरवर कर्मचारी दाखविण्यात आल्याने प्रत्यक्ष रुग्णसेवा मिळत नाही. रुग्णांचे हाल होत आहेत. एकूणच वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार संश्यास्पद असून, यामध्ये सुधारणा करा अन्यथा 21 जून रोजी वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.