नगराध्यक्षांना मिटींगपासून दूर ठेवणे शोभनिय नाही !

शहर विकास होताना संकुचित मनोवृत्ती नको !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2026 19:49 PM
views 137  views

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजेंची प्रतिक्रिया 

सावंतवाडी : मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवून आजच्या सभेला मी उपस्थित राहीले होते. तेव्हा काही नगरसेवकांनी माझ्या ऑनलाईन सहभागाला विरोध केला. माझ्या माहितीप्रमाणे रजेवर असणाऱ्या नगराध्यक्षांना ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभाग घेता येत नाही असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने एखाद्या नगराध्यक्षाला असे मिटींग पासून दूर ठेवणे हे संस्कृतीला शोभनिय नाही. मी मुलाला जन्म दिला असुन त्या प्रेग्नसीसाठी मी रजेवर आहे. ही आजारपणाची रजा नसताना मला ऑनलाईन उपस्थित राहण्यास विरोध करणे, एका महिलेला अशी वागणूक देणे अयोग्य आहे. सावंतवाडी शहराचा विकास होत असताना अशी संकुचित मनोवृत्ती असता कामा नये अशी प्रतिक्रिया सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 


त्या म्हणाल्या, नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. मी या सभेला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्या संदर्भात मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळविले होते. मी जेव्हा महिन्याभरापूर्वी प्रेग्नेंसीच्या रजेवर गेले तेव्हाच या शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी मी रजेवर असले तरी शहर विकासाच्या दृष्टीने ॲक्टिव्ह राहून काम करणार आहे असे वचन  दिले होते. ऑनलाईन बैठक अथवा कामकाजाची माहिती घेत राहणार असे सूचित केले होते. आज सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली तेव्हा मी मुंबईहून ऑनलाईन झूमद्वारे बैठकीला उपस्थित होते. जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा काही नगरसेवकांनी माझ्या ऑनलाईन सहभागाला विरोध केला. माझ्या माहितीप्रमाणे  रजेवर असणाऱ्या नगराध्यक्षांना ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभाग घेता येत नाही असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. मी लोकनियुक्त नगराध्यक्षा असून सावंतवाडी शहराच्या प्रगतीबाबतीत माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे. शहराच्या संस्कृतीच्या  आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने एखाद्या नगराध्यक्षाला असे मिटींग पासून दूर ठेवणे हे संस्कृतीला शोभनिय नाही. आपला भारत देश स्त्रीचा सन्मान राखणारा देश आहे. आजचे युग हे एआयचे युग आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हाही प्रगत होत आहे. या प्रगत जिल्ह्याच्या सावंतवाडी सारख्या पर्यटन शहराच्या  प्रथम नागरिक म्हणून मला जनतेने निवडून दिले. मी तेव्हा जनतेला  अभिवचन दिले होते. मी कुठल्याही आजारपणाच्या रजेसाठी गेलेले नाही. तर एका मुलाला जन्म दिला असल्याने मी सध्या रजेवर आहे, असे असताना मला ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहण्यास विरोध करणे, एका महिलेला अशी वागणूक देणे हे खरंतर अयोग्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 


तसेच कोरोना महामारी पासून ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली आहे. अनेक मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी हे ऑनलाईन बैठकींना व उपक्रमांना हजेरी लावतात. त्यात गैर असे काही नाही. मग, सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात असे कृत्य करणे म्हणजे सावंतवाडी शहरातील नागरिकांचा तो अपमान आहे, महिला वर्गाचा ही अपमान आहे. मला, अधिक काही बोलायचे नाही. परंतु, मला ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवत त्यावर प्रेसमध्ये भाष्य केले. त्यामुळेच मला माझी भूमिका मांडावी लागली. मी सावंतवाडीच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने विकासात्मक काम करण्याचे  ठरवले आहे. मी लवकरच सावंतवाडीत येणार आहे. सावंतवाडीच्या जनतेला मुबलक पाणी, स्वच्छ सावंतवाडी सुंदर सावंतवाडी, आणि पर्यटन विकास तसेच आरोग्य रोजगाराभिमुख प्रकल्प क्रीडा उपक्रम, युवक व महिलांच्या हातांना काम, एक आदर्श व पर्यटन शहर म्हणून या शहराला संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख कशी प्राप्त करून देता येईल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. केंद्र व राज्यातील महायुतीच्या सत्तेमुळे  विकासात्मक कामे आपल्याला वेगाने प्रगतीपथावर न्यायची आहेत. आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही. त्यामुळे ज्यांनी हे काही केले त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की, सावंतवाडी शहराचा विकास होत असताना अशी संकुचित मनोवृत्ती असता कामा नये. सावंतवाडीची जनता शांत, सुसंस्कृत आणि सुज्ञ आहे. ती बरोबर ओळखून आहे. त्यामुळे मी एवढेच सांगू इच्छिते आपण सर्वांनी एक होऊन काम करूया. जनतेच्या हितासाठी आपण कामात राहणे आणि वचनपूर्ती करणे हेच महत्त्वाचे आहे अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.