शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा

मालवण बंदची हाक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 28, 2024 06:19 AM
views 127  views

मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची देखील हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मालवण मधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत. निषेध मोर्चात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आम. जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १७ पोलीस अधिकारी, ५७ अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तरी शिवप्रेमी, नागरिकांनी शांततेत मोर्चा काढत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आज खासदार नारायण राणे हे सुद्धा राजकोट येथे जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा, राज्यातील बडे नेते मालवणात येऊन काय बोलणार आणि राणे त्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.