किर्लोस कृषि विज्ञान केंद्राद्वारे श्रीनिधी जातीचा प्रसार

अंडी व मांस उत्पादनासाठी श्रीनिधी जात फायदेशीर
Edited by:
Published on: January 13, 2025 15:57 PM
views 409  views

सिंधुदुर्ग : किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत परसबागेतील सुधारित कुक्कुटपालन व्यवसायास चालना देण्याचे काम अनेक वर्ष चालू आहे. विशेषत: परसबागेतील कुक्कुटपालनास व्यावसायिक स्वरूप यावे यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात विशेष करून गिरीराज, वनराज,  कलिंगा ब्राऊन, हितकरी, निर्भिक, ब्लॅक एस्ट्रोलार्प, आर. आय. आर. व  कावेरी वगैरे जातींचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे.

कारण बाजारामध्ये आजच्या घडीला देशी उत्पादनाबद्दल खरेदीदारामध्ये आकर्षण दिसून येते व गावठी कोंबड्यांच्या मांस व अंड्याना चांगला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळेच युवक, युवती, शेतकरी या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. 

श्रीनिधी जात बहुरंगी पिसांची आकर्षक काळ्या पांढर्याे मिश्र पिसांची असते. त्यामुळेच बाजारातून या कोंबड्यांना चांगली मागणी मिळू शकते. ही जात हैद्राबाद येथील डायरेक्टोरेट ऑफ पोल्ट्री रिसर्च या संस्थेने संशोधित केलेली आहे. या जातीच्या कोंबड्यांचे पाय उंच असल्यामुळे जलद पळण्याची क्षमता असून, नैसर्गिक शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. अंड्याच्या कवचांचा रंग तपकिरी - विटकरी रंगाचा असून बाजारामध्ये गावठी कोंबड्यांच्या अंड्या प्रमाणेच दर मिळतो. 

श्रीनिधी कोंबडी वर्षाकाठी 140 ते 150 अंडी देते. अंड्यांचे वजन 50 ते 55  ग्रॅम भरते.  श्रीनिधी नर कोंबड्याचे वजन 12 आठवड्यात 1.6 ते 1.8 किलो व 16 आठवड्यात 2.2 ते 2.8 किलो. पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन 2.0 ते 2.4 किलो असते. रोग प्रतिकारक्षमता उत्तम दर्जाची असते. श्रीनिधी कोंबड्या परसबागेत राहून उदरभरण करू शकतात व चांगल्या प्रकारे वाढतात.  अशा प्रकारची वैशिष्ट्ये त्या कोंबडी जातीत असल्या कारणाने सदर जातीची चाचणी प्रयोगासाठी निवड करण्यात आलेली आहे.