
सावंतवाडी : न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट, ता. कणकवली येथे मराठी विषयाचे अध्यापन करणारे प्रा. संतोष जोईल यांच्या 'काहीच सहन होत नाही!' या पहिल्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी सकाळी १० वाजता कला आणि वाणिज्य महाविद्यालय सभागृह फोंडाघाट येथे मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर, प्रसिद्ध उद्योजक मानसी माजगावकर, दीपक माजगावकर, ललित लेखक प्रा. वैभव साटम, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सुप्रसिद्ध व्याख्याते तथा निवेदक प्रा. रुपेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
कवी प्रा. संतोष जोईल यांच्या कवितासंग्रहातून जगण्याच्या जीव घेण्या संघर्षात धडपडणारी ही बिन चेहऱ्याची शेतकरी, कष्टकरी, परिघाबाहेरची ही सामान्य माणसं अनेक प्रश्नांची मालिका घेऊन पुढे उभे राहतात. या सर्व हाडामाणसांच्या संघर्षाला कवी आकार देऊ पाहतोय., आवाज देऊ पाहतोय. त्यांचे प्रश्न ऐरणीवर मांडून समाज परिवर्तनाचा विचार कवितेमधून अधिक प्रखरतेने मांडतो. कवी प्रा. जोईल यांच्या कवितेतून आलेले जीवनानुभवाचे दर्शन सर्व कष्टकरी माणसांची घुसमट, सभोवतालचे कठोर वास्तव, सामाजिक जाणीव, मानवी मूल्यांची होणारी पडझड, उध्वस्त झालेली स्वप्न, उराशी बाळगलेला आशावाद, जीवनदृष्टीचा मूल्ये भावनांचा कवितेतून व्यक्त झालेला विचार, अशा कितीतरी आशयाचे पदर कवितासंग्रह वाचताना दिसून येतात.
एकूणच समकालीन आणि सभोवतालच्या वास्तवाचा अधिक धीटपणे वेध घेणारी ही कविता एका सार्वत्रिक अनुभवाला शब्दरूप देते, आणि माणसाचे गीत अंत:करणातून गाते. म्हणूनच कवी संतोष जोईल यांची ही कविता आपण स्वीकारायलाच हवी!,
या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. संतोष जोईल यांनी केले आहे.