
सावंतवाडी : कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो. केवळ संगत, द्वेष भावना यातून गुन्हेगारी क्षेत्राकडे माणूस वळला जातो आणि त्यातूनच नकळतपणे गुन्हे घडून येतात जे आपण मनामध्ये विचार करतो तेच कृती आपल्याकडून होते. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र शिंत्रे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी जिल्हा कारागृह नं २ यांच्या संयुक्त विद्यमाने लीगल ऍड क्लिनिक अंतर्गत बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान कार्यक्रमात राजेंद्र शिंत्रे बोलत होते. यावेळी सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, अँड खुणे व अँड तेंडुलकर, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. राजेंद्र शिंत्रे यांनी करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान कसे जगावे याबाबत डॉ अब्राहम लिंकन बराक ओबामा यांचे उदाहरण देऊन जीवन कसे चांगल्या प्रकारे जगता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रा राजेंद्र शिंत्रे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात बंदीवानांना वेगवेगळी उदाहरणे देत जीवन कसे जगावे याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अँड खुणे व अँड तेंडुलकर यांनी प्रा. राजेंद्र शिंत्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी लीगल ऍड क्लिनिक आयोजित केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आभार मानले.