
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी राज्य काजू परिषद व काजू बोर्डाच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जात असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्यात २५ ते ३० केंद्रांवर काजू खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य काजू परिषदेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध विकास सहकारी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात काजू प्रक्रिया करणारे कारखानदार, बाजार समिती पदाधिकारी व संबंधित घटकांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत बोलताना दळवी म्हणाले की, चांगल्या दर्जाच्या काजूला अधिक दर देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, तांत्रिक बाबी पुढील एक-दोन दिवसांत पूर्ण करून आठवडाभरातच खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. विशेषतः विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, बाजारभावानुसार दर मिळण्याबरोबरच दर्जेदार काजूला अधिक दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही लाभ या केंद्रांवर काजू विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सध्या प्रति किलो १० रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली असून, शासन जेवढे अनुदान मंजूर करेल ते थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला. या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, काजू असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर तसेच जिल्ह्यातील काजू प्रक्रिया कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना स्थिर व हमी बाजारपेठ उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.











