एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लावणार : सुनिल डुबळे

एसटी राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या वेंगुर्ला तालुका आगारची नूतन कार्यकारणी जाहिर
Edited by: दिपेश परब
Published on: August 30, 2023 14:11 PM
views 424  views

वेंगुर्ला :  सिंधुदुर्ग एस टी विभाग राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या वेंगुर्ला तालुका आगार कार्यकारणीची बैठक २९ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला एसटी आगार येथे संपन्न झाली यावेळी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली तर अध्यक्ष सुनील डुबळे यांच्या हस्ते सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले. 

या बैठकीत राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या वेंगुर्ला तालुका आगार कार्यकारणीच्या अध्यक्षपदी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, सचिवपदी मधुकर भगत, संघटक सचिवपदी प्रवीण रेवणकर, सहसचिवपदी शरद भोसले, कार्याध्यक्षपदी स्वप्नील रजपूत, उपाध्यक्षपदी आशिष खोबरेकर, संदेश आकलेकर, प्रसिद्धीप्रमुख पदी मार्टिन डीसोजा, खजिनदार पदी संतोष चव्हाण, निधी सल्लागार पदी अर्जुन नाईक यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. यावेळी कार्यकारणी सदस्य अमित मसूरकर, सुनील धामोळे, भास्कर चुडजी, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अध्यक्ष सुनिल डुबळे म्हणाले की, सध्या या संघटनेचे एकूण ११० सभासद असून अजून सभासद होण्यासाठी इच्छुक आहेत. वेंगुर्ला एसटी आगराच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न संघटनेच्या प्रयत्नातून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व एक आदर्श संघटना म्हणून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जाणार आहेत.