
सिंधुदुर्गनगरी : महिला व बालकांविषयक वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील शालेय स्तरावर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्याकरीता सर्व शाळांमध्ये पोलीस दलातर्फे दि.03.10.2024 ते दि. 12.10.2024 रोजीपर्यंत सुरक्षा तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकिय व खाजगी शाळांमध्ये पोलीसांमार्फत भेट देण्यात येणार असुन भेटीदरम्यान शाळेतील CCTV, बैठक व्यवस्था, मुलांची वाहतुक व्यवस्था, शाळेतील मुले व मुली यांच्यासाठीची शौचालय व्यवस्था, हॉस्टेलची सुरक्षा, शाळा/हॉस्टेलमधील वॉर्डन याबाबत पोलीस दलांमार्फत विशेष सुरक्षा आढावा घेण्यात येणार आहे.
बालके व महिलांच्या सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल तत्पर असुन पिडीतास तात्काळ न्याय व मदत मिळणेसाठी जिल्ह्यात डायल 112 कार्यान्वित आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे आपातकालीन मदतीकरीता देखील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग संपर्क क्रमांक 02362-228614 व 8275776213 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सर्व नागरीकांना आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.