
वेंगुर्ला : १० वी १२ वी नंतर पुढे काय?असा प्रश्न ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नेहमीच भेडसावत असतो. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना मदत व्हावी, मार्गदर्शन मिळावे याचसाठी अणसूर -पाल विकास मंडळ ,मुंबई व माजी विद्यार्थी अणसूर-पाल हायस्कूल अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रेरणा करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. या मार्गदर्शक वर्गाला वेगवेगळया क्षेत्रातील ५ तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली होती.
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे"सिंधुदुर्गातील पर्यटन-उद्योग व व्यवसायाचे नवे पर्याय", असिस्टंट व्हेईकल इन्स्पेक्टर आर.टी.ओ.सिंधुदुर्ग पराग मातोंडकर यांचे "माझी यशोगाथा -स्पर्धा परीक्षेतील नोकरीच्या संधी", प्रा.मयुरेश रेडकर,बीकेसी,सावंतवाडी यांचे'फार्मसी क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या दुहेरी संधी', प्रा.मिलिंद देसाई, बीकेसी सावंतवाडी यांचे,'अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर ' तर युवा उद्योजक, महालक्ष्मी ॲग्रो प्रॉडक्टचे संचालक व प्रशालेचे माजी विद्यार्थी अंकुश गावडे यांचे'यशस्वी उद्योजकाची गरुडझेप' अशी विविध विषयांवरील उद्बोधक- प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली होती.
या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन संस्था सचिव लिलाधर गावडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले .अणसूर सरपंच सत्यविजय गावडे व पाल सरपंच कावेरी गावडे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले.
याप्रसंगी विविध विषयांवर पाचही व्याख्यात्यानी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन व विद्यार्थ्यी- पालकांच्या प्रश्नांचे शंका समाधान केले. यावेळी कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी ,"शाश्वत व विकास या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत.आपण शाश्वत जीवनशैली, जी आपल्या पूर्वजांकडून आपल्या कडे आली ती जपली पाहिजे तरच कोकणचं सौंदर्य टिकून राहिल."असे आग्रही प्रतिपादन करून, आपली कोकणी संस्कृती जपण्याचे आवाहन केले. आर.टी.ओ ऑफिसर पराग मातोंडकर यांनी 'be a different' बनण्याचा सल्ला देतानाच'स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत व चिकाटीची गरज असल्याचे'प्रतिपादन केले.
बीकेसी , सावंतवाडीचे प्रा.मिलिंद देसाई व प्रा.मयुरेश रेडकर यांनी अभियांत्रिकी व फार्मसी क्षेत्रातील प्रवेश व नोकरीच्या वेगवेगळया संधीवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. युवा उद्योजक अंकुश गावडे यांनी शुन्यातून विश्व निर्माण करताना एव्हढ्या मोठ्या उद्योगाचे निर्मिती करताना आलेले कटू-गोड अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. त्यांनी विद्यार्थ्यांना"उद्योग-व्यवसाय करताना किमान ५ वर्ष संयम ठेवा, यश लगेचच मिळणार नाही"असा मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या "कलाउत्सव" स्पर्धेत पखवाजवादनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेल्या व पूणे येथील राज्यस्पर्धेत जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेल्या संतोष उत्तम नाईक याचा आर.टी.ओ.ऑफिसर पराग मातोंडकर यांच्याहस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी प्रा.जगन्नाथ गावडे यांचे तसेच सर्व पाचही व्याख्याते यांचे यावेळी शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठांवर सदस्य दिपक गावडे, देऊ गावडे, दत्ताराम गावडे ,संस्था सदस्य बाबाजी गावडे , राजन गावडे, गुंडू गावडे, पाल उपसरपंच प्रिती गावडे,पालक , ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. हा मार्गदर्शन वर्ग यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी प्रा. जगन्नाथ गावडे, अनिकेत ताम्हणकर, गजमुख गावडे, शिक्षिका अक्षता पेडणेकर व चारुता परब यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव लिलाधर गावडे, सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेश घाटवळ , व्याख्यात्यांची ओळख शिक्षक विजय ठाकर व माजी विद्यार्थी नंदन ताम्हणकर यांनी तर आभार संस्था सदस्य बाबाजी गावडे यांनी मानले.