
दोडामार्ग : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो , समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. कवी विं.दा.करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे ' आपण देणाऱ्याचे हात म्हणजेच देणाऱ्यांची वृत्ती घ्यायला हवी ' असा संदेश शहीद पोलिस नितीन श्रीधर परब यांच्या नवव्या स्मृिती दिनी नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत खाकी वर्दीतील कवी दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिला.
यावेळी व्यासीठावर संस्था सचिव गणपत देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष संजय देसाई, पोलिस कर्मचारी अनिल कांबळे, मुख्या. महेंद्र देसाई, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी मान्वरांच्या हस्ते शहीद नितीन श्रीधर परब यांच्या नवव्या स्मृतिदिनी काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. निसर्ग ओतारी यांनी ' पोलिस ' नावाची कविता सादर करून उपस्थितांमध्ये पोलिसांबद्दल आदर निर्माण करून दाद मिळवली.
यावेळी गणपत देसाई यांनी पोलिस निरीक्षक श्री. ओतारी यांनी दिलेला संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे सांगितले. यावेळी संजय देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुखयाध्यापक महेंद्र देसाई यांनी, सूत्रसंचालन शिक्षक उमेश देसाई यांनी तर आभार शिक्षक सतीश धर्णे यांनी मानले.