
देवगड : स्वच्छता कामांची सांगड घालून तसेच गावांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधांनुसार आदर्श आराखडा तयार करा असे आवाहन पं. स. देवगड समन्वयक विनायक धुरी यांनी हिंदळे येथील गणस्तरीय कार्यशाळेत आवाहन केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०२४-२५ ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत गणस्तरीय कार्यशाळा हिंदळे ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली.
या गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच उद्घाटन हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले .यावेळी व्यासपिठावर नारींग्रे सरपंच महेश राणे, पोयरे सरपंच गिता राणे, खुडी सरपंच दीपक कदम, मुणगे उपसरपंच दशरथ मुणगेकर, मास्टर ट्रेनर वर्षा गोसावी, मास्टर ट्रेनर कोकणी, ग्रामपंचायत अधिकारी महेश कुबल आदी मान्यवर तसेच प्रशिक्षणासाठी हिंदळे, खुडी, पोयरे, मुणगे, गावांतील सरपंच, उपसरपंच, बचतगट प्रतिनिधी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते.
एक दिवशीय गणस्तरीय प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर वर्षा गोसावी व मास्टर ट्रेनर कोकणी, ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा आळवे यांनी २०२४-२५ अंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत आराखड्यात महिला व बालकल्याण, मानव विकास निर्देशांक तसेच स्वच्छता विषयक कामांबाबत अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार ग्रामपंचायत अधिकारी महेश कुबल यांनी मानले .