
कुडाळ : कोकणचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरूर (जि. प. मतदारसंघ) शिवसेना पक्षाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेरूर गावचे ग्रामदैवत श्री देव कलेश्वर चरणी 'लघुरुद्र' अभिषेक करून राणे साहेबांना दीर्घायुष्य लाभो, असे साकडे घालण्यात आले.
नेरूर येथील प्रसिद्ध कलेश्वर मंदिरात सकाळी अत्यंत भक्तीमय वातावरणात हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी राणे यांच्या नेतृत्वाचा गौरव केला.
नारायण राणे यांना उत्तम आरोग्य, सुख-शांती आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना श्री देव कलेश्वर चरणी करण्यात आली. कोकणच्या विकासात नारायण राणे यांचे योगदान मोठे असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास अधिक जोमाने व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्यासाठी प्रार्थना केली. यावेळी नेरूर परिसरातील शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. "राणे साहेब म्हणजे कोकणच्या विकासाचा कणा आहेत, त्यांना भविष्यातही असेच जनसेवेचे बळ मिळावे," अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.











