प्रवीण बांदेकर यांनी मराठी साहित्याला नवे परिमाण दिले! ; भालचंद्र नेमाडे यांचे गौरवोद्गार

ना. धो महानोर पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना प्रदान
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 18, 2022 10:33 AM
views 212  views

सावंतवाडी : प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या लेखनामध्ये कोकणच्या समकालीन संस्कृती व वर्तमानाचे थेट संदर्भ दिसतात. या लेखनाने मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून दिले आहे. सावंतवाडीसारख्या एका टोकावरच्या छोट्या गावात राहून बांदेकरांनी घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे. माझा विद्यार्थी म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी काढले. ज्या समाजामध्ये कला वाढते तो समाज समृद्ध बनतो समाजाला उत्क्रांत अवस्थेला नेण्याची क्षमता केवळ कलांमध्ये असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगाव येथे केले.

  जळगाव येथील भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे द्विवार्षिक साहित्य पुरस्कार २०२१ च्या प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. जैन हिल्स गांधी तीर्थस्थित कस्तुरबा गांधी सभागृहात सर्वोत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार संध्या नरे-पवार, सर्वोत्कृष्ट कवी बालकवी ठोंबरे पुरस्कार वर्जेश सोळंकी, तर सर्वोत्कृष्ट गद्य लेखक ना. धो  महानोर पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, एक लाख रुपयांचा धनादेश, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कांताबाई जैन साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार चित्रकार प्रभाकर कोलते यांना प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर दत्तूभाऊ जैन, कविवर्य ना. धो. महानोर, डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, निशा जैन, डॉ. भावना जैन उपस्थित होते.

ग्रंथपाल अशोक चौधरी, ज्ञानेश्वर शेट्टी यांनी संपादन केलेल्या आणि युवराज माळी यांनी प्रकाशित केलेल्या 'बहिणाबाई' पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.