कणकवली : सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गच्या वतीने रविवार 29 डिसेंबर रोजी कणकवली येथे पहिले एक दिवशीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम आणि सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.
या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी तथा समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विद्यमान अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.कोकणात विद्रोही परिवर्तनवादी साहित्य चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आणि इथल्या विद्रोही परंपरेतील साहित्यिकांना महाराष्ट्राच्या मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात घेऊन जाण्यासाठी सम्यक संबोधी साहित्य संस्थेची स्थापना करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर पहिले सम्यक संबोधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुणवत्ता असूनही दुर्लक्षित राहणाऱ्या लेखक कवीना प्रेरणा देण्यासाठी सम्यक संबोधी साहित्य पुरस्कार या संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणार असून या संमेलनात या पहिल्या पुरस्काराने कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित कवितासंग्रहाला गौरविण्यात येणार आहे.
कोकणात विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते मात्र सर्वांनाच कविता वाचनासाठी संधी मिळतेच असे नाही.त्यामुळे या संमेलनात दुर्लक्षित राहणाऱ्या कवीना निमंत्रित करून त्यांचे खास कविता वाचन ठेवण्यात आले आहे. तरी ज्या कवींना या संमेलनात कविता वाचायची इच्छा असेल त्यांनी खालील संपर्क नंबरशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रवीण बांदेकर हे मराठीतील आजचे आघाडीचे कादंबरीकार असून दोन वर्षांपूर्वी त्यांना साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आह. चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फार्म या तीन त्यांच्या कादंबऱ्या बहुचर्चित असून त्यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी आणि कविसंमेलनाच्या नाव नोंदणीसाठी संपर्क नंबर- 94229 63655