प्रतिभा डेअरी प्रकरण ; ACB चौकशी व्हावी

शिवसेनेची मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 12:49 PM
views 516  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी प्रतिभा डेअरी आणली. त्या माध्यमातून अडीच कोटींना शेतकऱ्यांना फसविण्यात आले. जि.प. मध्ये एलईडी व वॉटर फ्युरीफायर घोटाळा झाला. याची चौकशी एसीबीने करावी. तसेच ९०० कोटी रुपये खर्चाच्या एजी डॉटर्स या कणकवली नगरपंचायतीच्या प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिली, त्याचे काय झाले? याला जबाबदार कोण? असा सवाल शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केला.


पत्रकारांशी बोलताना श्री. खोत म्हणाले, श्री. राणे यांच्या माध्यमातून प्रतिभा डेअरी आणण्यात आली. या अडीज कोटींच्या रक्कमेबाबत डीपीडीसी बैठकीत वादविवाद झाला, त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जबाबदारी घेतली. त्याचे पुढे काय झाले? याची चौकशी एसीबीने करण्याची गरज आहे.


जिल्हा परिषदेमदये एलईडी व वॉटर प्युरीफायर घोडाळा झाला. त्यात अहवालही आला. पण पुढे काहीच झाले नाही. यात तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांचे पीएस असलेले अधिकारी होते. त्यांनी त्यावर सही केली. याची दखल एसीबीसारख्या यंत्रणांनी घ्यायला हवी. किंवा न्यायालयही याबाबात सुमोटो याचीका दाखल करून घेऊ शकते.


कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून ९०० कोटींचा एजी डॉटर्स नावाने प्रकल्प आणण्याचे जाहिर झाले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नगरपंचायतीची जागा त्यांना भाड्याने देण्यात आली. ती जागा त्यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यात भाडे किती मिळाले? जागेचे पुढे काय झाले? प्रकल्पाचे पुढे काय झाले? याला जबाबदार कोण? या साऱ्याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही श्री. खोत यांनी केली..


आमदार वैभव नाईक यांचीच कशाला आम्हा सर्वांचीच चौकशी करा. वाटल्यास जेलमध्ये टाका. श्रीकृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला. जेलमधून आल्यानंतरच त्याने कंसाचा वध केला. शिवसेनेला १९६६ पासून लढण्याची परंपरा आहे. त्यामुळे एसीबीच्या विरोधात १८रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्वांनी पाठींबा देत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे. कारण आज जे सुपात आहेत, ते उद्या जात्यात असतील, असेही श्री. खोत म्हणाले.