जिल्ह्यातील प्राथ. आरोग्य केंद्रांच्या डागडुजीसाठी निधी मिळावा

संजय आंग्रेंनी वेधलं पालकमंत्र्यांचं लक्ष
Edited by:
Published on: July 21, 2023 21:23 PM
views 131  views

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अंतर्गत डागडुजीसाठी विशेष बाब म्हणून प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुरत्न समिती चे सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आग्रे यांनी हे निवेदन दिले. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील उपस्थित होते.

अलीकडेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिफे यांची भेट घेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक साधनसामुग्री बाबत चर्चा केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत अंतर्गत डागडुजीसाठी निधीची आवश्यकता असल्याचे समोर आले होते. त्या अनुषंगाने आज आग्रे यांनी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात आग्रे यांनी म्हटले आहे की जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थाने आदी दुरुस्ती साठी निधी मिळावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वच्छतागृहाचे दरवाजे, खिडक्या पाईपलाईन आदी कामांसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 2 ते 3 लाख निधी द्यावा. सदर निधी संबंधित आरोग्य केंद्रास अधिनिष्ठ करावे. जेणे करून खेडेगावातील सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.