
मुंबई : चिपळूणसह संपूर्ण कोकणात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण करत वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तथा 2024च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट राष्ट्रवादीकडून अवघ्या 6000 मतांनी पराभूत झालेले उद्योजक प्रशांत बबन यादव यांनी आज (मंगळवार) दुपारी भाजपमध्ये शक्तीशाली प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तब्बल 1600 हून अधिक कार्यकर्त्यांनी एकाच वेळी भाजपचा झेंडा हातात घेतला.
प्रवेश सोहळ्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, तसेच कोकणचे प्रभावी नेते व राज्याचे मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी यादव यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.
३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे
सकाळीच चिपळूणमधून प्रस्थान करताना प्रशांत यादव यांनी वालोपे येथील झोलाई देवीचे व कुटुंबीयांसह संपत्ती दर्शन घेतले. त्यानंतर जवळपास ३००हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. मुसळधार पाऊस असूनही यादव यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले.
ढोल-ताशांच्या गजरात पक्षप्रवेश
दुपारी तीन वाजता यादव यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चिपळूणमधील विघ्नहर्ता ढोल पथकाच्या गजरात यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना प्रशांत यादव म्हणाले, “चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुंबईत येऊन माझ्या पाठीशी उभे राहून मला बळ दिले. माझ्या घरातही पाणी आहे, तरीही आपण सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहात, हा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
कोकणात भाजपची ताकद वाढत आहे : नितेश राणे
मंत्री नितेश राणे यांनी या सोहळ्यात बोलताना, “प्रशांत यादव हे तळागाळाशी जोडलेले नेतृत्व आहे. त्यांनी 2024च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवली. आता त्यांनी भाजपकडे वळून कोकणात आमची ताकद आणखी वाढविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातून भाजप गावागावात पोहोचेल याचा विश्वास आहे,” असे सांगितले.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : रवींद्र चव्हाण
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात, “प्रशांत यादव हे आमचे मित्र असून त्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गावागावात पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रित करायचे आहे. यादव यांचा विश्वास तुटणार नाही याची ग्वाही आम्ही देतो,” असे स्पष्ट केले.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ स्वप्ना यादव, जनार्दन पवार, दत्ताराम लिंगायत, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण, योगेश शिर्के, दीपक महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, दीप्ती महाडिक, अनिल चिले, शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, रमण डांगे, स्मिताताई चव्हाण, एडवोकेट नयना पवार, नितीन सावंत, सुगंधा माळी, सरस्वती हरेकर, अनंत हरेकर, सुभाष नलावडे, विजय कोळेकर, अनिल यादव, अभिनव भुरण, समीर बेचावडे, सुनील वाजे, रवींद्र सागवेकर, रमेश गोलामडे, रवींद्र पवार चंद्रकांत बैकर, विभावरी जाधव, शशिकांत दळवी, अॅड. नितीन सावंत, अॅड. नयना पवार, अॅड. वैभव हळदे, डॉ. अमरसिंह पाटणकर, अभिजीत सावंत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकूण १६०० जणांनी या प्रवेशावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवेशावेळी जिल्हा परिषदेचे ३ माजी सदस्य, पंचायत समितीचे ६ माजी सदस्य, सभापती, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, डॉक्टर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोकणात भाजपसाठी ‘गेम चेंजर’?
या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे कोकणातील भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. 2024च्या निवडणुकीत अवघ्या 6000 मतांनी पराभव पत्करावा लागलेले प्रशांत यादव यांचे राजकीय पाऊल 2029 च्या निवडणुकीसाठी भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.