प्रसाद लोके हत्या प्रकरण ; शस्त्रे - गाडी देवगड पोलिसांनी केली हस्तगत !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 21, 2023 12:08 PM
views 473  views

देवगड : मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके च्या खूनप्रकरणी पोलिसांनी मालवण तालुक्यातीलच आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित किशोर पवार याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडी व रक्ताळलेले कपडे हस्तगत केले आहेत. दरम्यान प्रसाद लोके याचा निर्घृण खुन का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

बुधवारी सकाळी पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांनी संशयितासह मालवण गाठले व त्याच्याकडून चौकशी करून धबधब्यात लपविलेली गुन्ह्यासाठी वापरलेले शस्त्रे, रक्ताचे डाग असलेले कपडे व गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी ताब्यात घेतली.


मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके(३१) याचा सोमवारी सकाळी मुणगे मसवी रस्त्यावर त्याचाच गाडीच्या बाजुला रक्ताचा थारोळ्यात मृतदेह आढळला होता. त्याला रविवारी भाडेतत्वावर गाडी पाहिजे आहे असा फोन आल्यानंतर सोमवारी पहाटे ३.३० वा.सुमारास तो त्याचा ताब्यातील व्हॅगनार गाडी घेवून घरातून निघून गेला होता. गाडी भाडे तत्वावर पाहिजे असल्याचा फोन आल्याचे त्यांनी कुटूंबियांनाही सांगितले होते.


दरम्यान मुणगे मसवी रस्त्यावर सोमवारी पहाटे त्याच्याच गाडीच्या बाजुला प्रसाद याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.याबाबत पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी प्रसाद याचा डोक्यावर, कपाळावर वार करून निर्घृण खुन झाल्याचे निदर्शनास आले तसेच त्याचा गाडीवरही हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या निर्घृण खुनप्रकरणी प्रसाद याच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकॖयाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वषेण विभाग व देवगड पोलिस यांनी तपासाला युध्दपातळीवर सुरूवात केली.घटनास्थळाचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सायबर पोलिस ठाण्याचा मदतीने प्रसादच्या मोबाईल फोन क्रमांकाचे विश्लेषण केले.त्याचबरोबर त्याचा निर्घृण खुनप्रकरणी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने हा गुन्हा किशोर परशुराम पवार रा.कुंभारमाठ याने केल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारीच त्याला ताब्यात घेतले.त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली.

मंगळवारी सकाळी देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे िरफवून बुधवारी सकाळी संशयिताला मालवण येथे नेवून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडी व रक्ताचे डाग असलेले कपडे ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यात पोलिसांनी मालवण तालुक्यातीलच आणखी एका संशयिताला चौकशीसाठी बोलविल्याचे समजते. संशयित किशोर पवार यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र प्रसाद लोके याचा निर्घृण खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या खुनात आणखी कोणाचा सहभाग आहे, हा खुन नेमका कोणत्या कारणासाठी केला आदीचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिस करीत आहेत.