
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ग्रामसेवकांनी हे प्रतिज्ञापत्र द्यावे हा शासन निर्णय असताना राज्यस्तरीय ग्रामसेवक संघटनेने नकार दिल्यामुळे सिंधुदुर्गातील ग्रामसेवकांनी हे प्रमाणपत्र देणार नसल्याचे धोरण अवलंबिले आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे हे आडमुठे धोरण असून त्यांची ही हुकूमशाही आपण सहन करणार नाही. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जनतेच्या या प्रश्न घेराव घालून सरकारचे लक्ष वेधू व ग्रामसेवकांच्या या मनमानी विरोधात सिंधुनगरी येथे घंटानात आंदोलन करून सरकारला जागे करून असा इशारा स्वाभिमानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या १७ संघटना असून ग्रामसेवकांच्या हुकूमशाही धोरणा विरोधात सर्व संघटना एकवटल्या आहेत. गेले अनेक दिवस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाकडे चर्चा सुरू आहे. रात्र जिल्हा परिषद प्रशासनाने ही याबाबतचा मार्ग काढला नाही. म्हणूनच या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रसाद गावडे यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत निवारा बांधकाम संघ चे अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधू बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अशोक आवळेकर, श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण आधी पदाधिकारी उपस्थित होते.