
वैभववाडीः रासप पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज वैभववाडी येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेत जिल्ह्यातील धनगरवस्तीतील मुलभूत प्रश्न श्री.रावराणे यांनी श्री.जानकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
पशुसंवर्धन,दुग्ध, मत्सविकास खात्याचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी सोमवारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडीवस्तीवरील विशेषतः डोंगर द-यात असलेल्या धनगर वस्तीतील समस्या जाणून घेतल्या.आजही काही वस्त्या रस्ते, पाणी , वीज या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अशा धनगर वस्त्याचा सर्व्हे करुन आवश्यक त्या ठिकाणी भुसंपादन करुन प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी श्री. रावराणे यांनी श्री जाणकर यांच्याकडे केली.श्री.रावराणे यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवत येथील प्रश्न मार्गी लावण्याचा श्री.जानकर यांनी शब्द दिला.