
सावंतवाडी : निरवडे ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. गावातील नव्याने विवाह केलेल्या दांपत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेत नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दिल्याशिवाय विवाह नोंदणीचा दाखला देण्यात येणार नाही, तसा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. हा ठराव घेणारी निरवडे ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी आहे.
गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा ठराव घेत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हवा शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. झाडे आणि वनस्पती मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणही निरोगी ठेवतात. ते हवामानावरही नियंत्रण ठेवतात. अधिक झाडे लावल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते. हीच बाब लक्षात घेत तालुक्यातील निरवडे येथील सरपंच सुहानी गावडे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून नवदाम्पत्याने घरासमोर एक झाड लावून झाडाचा फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखवल्यानंतर विवाह प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला. गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे. यावेळी सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामसेवक सुनीता कदम, ग्रामपंचायत सदस्य अंगारिका गावडे, आदेश जाधव, आनंदी पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेंद्र गावडे, सुहास गावडे बाबल सावळ, निधी शिरोडकर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.