महायुती टिकवायची असल्यास कदमांनी माफी मागावी : प्रभाकर सावंत

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 19, 2024 14:11 PM
views 157  views

सिंधुदुर्गनगरी : आज युतीतील घटक पक्ष असलेल्या सेनेच्या रामदास कदमांनी माननीय पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याबद्दल काढलेल्या गैरउदगारसाठी माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात महायुती बाबत विचार करावा लागेल. पालकमंत्री यांनी संपूर्ण कोकणात महायुतीसाठी मोठं काम उभे केलेले आहे, बांधकाम मंत्री झाल्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी विधायक कामे केलेली आहेत, असे असताना स्वतःच्या मंत्रिपदाच्या कालावधीत कोकणासाठी काहीच काम न करणाऱ्या व्यक्तीने कार्यतत्पर लोकानेत्याबाबत असे विधान करणे अत्यंत निंदाजनक आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे.जर युतीतील जबाबदार नेत्यामार्फत समोरून असे वागणे वारंवार होत असेल आणि त्या पक्षाचे वरिष्ठ जर त्याला आवर घालणार नसतील तर युतीसाठी आमचा कोणीही कार्यकर्ता तयार असणार नाही आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या वादाला आणि समोरच्या पक्षाच्या नुकसानीला तीच मंडळी जबाबदार राहणार आहेत.

आज या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे जिल्ह्यातील तमाम भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे याची नोंद संबंधितांनी घ्यावी आणि रामदास कदम यांना माफी मागायला लावावी. या जिल्ह्यात मनात आणले तर भाजपा तीनही जागा स्वबळावर जिंकू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे, आणि त्याची कल्पना युतीतील इथल्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे या विषयावर सेनेच्या वरिष्ठांनी गंभीरपणे विचार करावा. जोपर्यंत माफीनामा येत नाही तोपर्यंत महायुतीच्या कोणत्याही समन्वय बैठकीला आमचं सहकार्य असणार नाही.