हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी : प्रभाकर सावंत

Edited by: लवू परब
Published on: February 16, 2026 18:48 PM
views 71  views

सिंधुदुर्गनगरी :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारी केलेली टिप्पणी वादग्रस्त ठरली असून, या वक्तव्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष नेहमीच धार्मिक आणि सांप्रदायिक भावना भडकावणारी भूमिका घेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पराक्रम, शौर्य आणि स्त्रीसन्मानाच्या धोरणाची संपूर्ण देशाला जाणीव आहे. शत्रुपक्षातील स्त्रियांनाही मातेसमान मानण्याची त्यांची भूमिका इतिहासात नोंदलेली आहे.

याउलट टिपू सुलतान याचा इतिहास क्रौर्याशी जोडला जातो,स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना जनान खाण्यात ठेवणारा सुलतान  असे सावंत यांनी नमूद केले. शौर्याची तुलना क्रौर्याशी होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनीही या विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची तुलना टिपू सुलतानाशी करणे महाविकास आघाडीला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संबंधित पक्षांच्या मौनामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

इतिहासातील कटू घटनांचा संदर्भ देत टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनतेत तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.