
कणकवली : कोकणातील कवी उदय जाधव यांच्या प्रभाव प्रकाशन कणकवलीने प्रकाशित केलेल्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा व चर्चा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी सायं.५.३० वा.मुंबई गोरेगाव केशव गोरे स्मारक मध्ये आयोजित करण्यात आला आहे. दीपतारांगण क्रिएशनने संयोजन केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार आणि कवी प्रेमानंद गज्वी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या संग्रहाच्या चर्चेत नामवंत कवी कवी अजय कांडर, ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा fनृत्यांगना मेघा घाडगे सहभागी होणार आहेत.
कवी उदय जाधव हे कोकणातील नामवंत नाट्य लेखक आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. अलीकडे त्यांचा विविध एकांकिकेचा एक ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर कणकवलीच्या प्रभा प्रकाशनातर्फे आता त्यांचा पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला असून त्याचा हा प्रकाशन समारंभ आणि त्यावरील सदर चर्चा मान्यवर अभ्यासकांच्या सहभागाने आयोजित करण्यात आली आहे.कवी उदय जाधव यांच्या 'पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर', या कवितासंग्रहातील कविता जगाचा विद्रुप चेहरा समोर आणते. तर दुसऱ्या बाजूला स्वतःवर विश्वास ठेवत आत्मविश्वासाने चालत राहण्याचा संदेश देतानाच स्वतःच्या जगण्यालाच अंतर्मुख करण्याचा तळ खोदते. यामुळे ही कविता आजच्या जगण्याची खऱ्या अर्थाने स्थिती- गती मांडते. माणसाचं माणूसपण हरवून त्याचे पशुमध्ये रूपांतर होणे याच्यासारखा विनाश कुठलाच नाही. या विनाशावर ही कविता 'पशुत्वाची वाढतेय शिडी/खोल दांभिक गूढ भयानं' असं म्हणत नेमकेपणाने बोट ठेवताना माणसाचं आतलं हिंस्त्रपण दाखवून देते. स्वत्व गमावलेल्या, जगण्याचं किड्या मुंग्यांसारखं जनावर होणं हे जस वाईट असतं, तसं याची जाणीवही न होणे हेही त्यापेक्षा वाईट असतं. मात्र, 'पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर', मधील कविता याची जाणीव वाचकाला करून देतानाच, स्वतःचा आत्मसन्मानही गमवू नका अशी सत्वाची भाषा बोलते हे या कवितेचे सर्वाधिक मोल आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.