सत्ताधाऱ्यांकडून स्टॉलधारकांची होणारी फसवणुक थांबविल्यामुळे पोटशुळ : मंगेश लोके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 15, 2024 12:42 PM
views 278  views

वैभववाडी : नगरपंचायतीपासुन केंद्रापर्यत सत्ता असताना सत्ताधारी वैभववाडी शहराचा कोणताही विकास करू शकले नाहीत.याच समस्या आमच्या नगरसेवकांनी जनतेसमोर मांडल्यामुळे सत्ताधाऱ्यांना पोटशुळ उठला असल्याची टिका करतानाच स्टॉलधारकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला आमचा पाठींबा असेल असे मत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी व्यक्त केले आहे. दोन दिवसांपुर्वी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी श्री.लोकेवर तर उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी स्विकृत नगरसेवक मनोज सावंत यांच्यावर जोरदार टिका केली होती.त्याला आज श्री.लोके यांनी प्रत्युत्तर दिले.

नगरपंचायतीतील सत्ताधारी शहरातील पिण्याच्या पाण्याचा,सांडपाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे. आमच्या शहरातील नगरसेवकांनी जनतेसमोर याच समस्या मांडल्यानतंर सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे.काय करावे ते त्यांना सुचत नाही.त्यामुळे स्वताचे अपयश लपवुन ठेवण्यासाठी आता आमच्या आरोप करण्याचे काम नगरपंचायतीचे पदाधिकारी करीत आहेत.

बांधकाम सभापती श्री.रावराणे यांची स्टॉलधारकासंदर्भात काय भुमिका होती ही सर्व स्टॉलधारकांना माहीती आहे.त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही.नगरपंचायत स्टॉलधारकांचे पुनर्वसन करताना त्यांची फसवणुक करीत होती.ही फसवणुक आम्ही थांबविण्याचे काम केले आहे.नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी शहरातील सर्व स्टॉलधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे आमचा त्याला पाठींबा असेल.परंतु त्यांची फसवणुक करणार असाल तर आम्ही ती होवु देणार नाही.स्टॉलधारकांचे पुनर्वसन शासकीय गोडावुन जवळ करणार होता मग अगोदर स्टॉल हटविण्याचे कारण काय?स्टॉल हटविण्याची घाई श्री.रावराणे यांनाच होती.श्री.रावराणे हे सज्जनकाका रावराणे यांचे सुपुत्र आहेत.सज्जनकाका आणि आमचे अनेक वर्षाचे पक्षीय राजकारणापलीकडचे सबंध आहेत.परंतु जर श्री.रावराणे कुणाच्या तरी नादाला लागून नौटंकी करीत असतील तर मात्र त्यांना पळताभुई थोडी होईल हे त्यांनी विसरू नये.त्यांनी शहरात काय काय घोळ घालुन ठेवले आहेत.त्याचा लेखाजोखा माझ्याकडे आहेत हे त्यांनी विसरू नये.

स्विकृत नगरसेवक मनोज सावंत यांच्यावर टिका करताना उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचा देखील तोल गेल्याचे दिसुन येत आहे.श्री.सावंत हे ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत.त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न श्री.सावंत यांनी करू नये अन्यथा त्यांची कुंडली देखील बाहेर काढावी लागेल.असा इशारा देखील त्यांनी दिला.