‘डान्सिंग कार’चा अनुभव घ्यायचाय ? कुडाळ - मालवण रस्त्यावर या !

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 30, 2025 16:09 PM
views 1083  views

कुडाळ : तुम्हाला जर ‘डान्सिंग कार’चा अनुभव घ्यायचा असेल, तर आता त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. कुडाळ-मालवण रस्त्यावर प्रवास केल्यास तुम्हाला हा अनुभव अगदी विनामूल्य मिळू शकतो. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना गाडी चालवताना सतत उड्या मारत असल्यासारखे वाटते, त्यामुळे या रस्त्याला ‘डान्सिंग कार’चा अनुभव देणारा रस्ता असे उपरोधिकपणे म्हटले जात आहे.

कुडाळ-मालवण रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. केवळ महामार्गच नव्हे, तर अंतर्गत रस्त्यांचीही चाळण झाली आहे. प्रशासनाच्या या वेळखाऊ धोरणाबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गणेश चतुर्थीच्या काळात मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. मात्र, त्यांना या खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी भजने, आरत्यांसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनाही या खड्ड्यांमुळे त्रास होत आहे.

पालकमंत्री यांनी वारंवार सूचना देऊनही रस्त्यांच्या कामात कोणताही बदल झालेला नाही. खड्डे बुजवण्यासाठी केलेली कामे दोन दिवसांतच पुन्हा उखडतात आणि विशेष म्हणजे, बुजवलेल्या ठिकाणी आधीपेक्षा जास्त खड्डे तयार होतात. प्रशासनाला कोकणातील जनतेची आणि त्यांच्या समस्यांची काहीही पर्वा नाही, अशीच भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पावसाच्या सरींमध्ये डांबर साखरेप्रमाणे वितळत असल्यामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे कोकणातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ या समस्येवर लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.