शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

Edited by: मनोज पवार
Published on: February 15, 2025 14:41 PM
views 318  views

चिपळूण  : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथील पटांगणावर आयोजित कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार शेखर निकम सपत्नीक उपस्थित राहिले. कार्यक्रमात त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले आणि सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करत स्वर्गीय शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम साहेब यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गुहागर चे आमदार भास्कर जाधव आणि  नाणीज चे नरेंद्र महाराज यांच्या हस्ते, आमदार शेखर निकम व  सौ. पूजाताई निकम यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपवण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक संदीप सावंत व त्यांचे सहकारी यांचे कौतुक करत आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कीर्तन महोत्सवाच्या यशस्वी आयोजकांना शुभेच्छा देत, हा महोत्सव समाजप्रबोधन व संस्कृतीच्या जतनासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

समाजहितासाठी समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन गौरव करणे ही समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि मराठा समाजाच्या प्रगतीला बळकटी देण्याचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरेल.

या प्रसंगी माननी नरेंद्र महाराज, अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, गोवा हायकोर्ट न्यायाधीश राजेश घाणेकर,महिला राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. स्वातीताई काशीक, गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव, राजापूरचे आमदार किरणशेठ सामंत , चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष सचिन कदम जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, मुंबई सरचिटणीस महेश सावंत, विभागीय अध्यक्ष आप्पा खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक कदम, प्रसाद लाड, कपिल शिर्के, किशोर घाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.