
सिंधुदुर्गनगरी : भारतीय डाक विभागातर्फे 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करण्यात आले व या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यासाठी डाक विभागामार्फत प्रयत्न करण्यात आले.
या वर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. यात सिंधुदुर्ग विभागामार्फत “डाक सामुदायिक विकास कार्यक्रम” अंतर्गत पोस्टाच्या सर्व सेवा व सुविधा एकच दिवशी, एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष “डाक-चावडी” चे आयोजन करण्यात आले होते. पोस्ट खात्याच्या या नवीन संकल्पनेला जिल्ह्यातील लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन डाक खात्याच्या विविध योजनांचा लाभ घेतला. या योजनांबरोबरच राष्ट्रीय डाक सप्ताहात सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत जिल्ह्यातील 14 ठिकाणी आधार कॅम्प आयोजित करण्यात आले होते या अंतर्गत 681 नवीन आधार व अद्यतनचे व्यवहार करण्यात आले.
सिंधुदुर्ग डाक विभागाने राबविलेल्या या डाक सप्ताहास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांकडून मिळाला. या सप्ताहात डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ लोकांनी घेतला. या सप्ताहात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर विशेष भर देण्यात आला. डाक विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या “महिला सन्मान बचत योजनेची” एकूण 1,223 नवीन खाती उघडण्यात आली आली. तसेच इतर बचत योजेंची 2,264 नवीन खाती उघडण्यात आली.
या डाक सप्ताहात जीवन विमा योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, ग्रामीण भागातील जनतेला जीवन विम्याचे व बचतीचे महत्व कळावे यासाठी “डाक-चावडीच्या” माध्यमातून या योजेनांची माहिती देण्यात आली. या सप्ताहात डाक जीवन विम्याचे एकूण 219 नवीन प्रस्ताव व रु. 31,52,152/- इतका नवीन प्रीमियम जमा करून 5.25 कोटी रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात आले.
डाक विभागाचा कणा असलेली टपाल सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी व वितरण अधिक चांगले होण्यासाठी तालुक्याच्या पोस्ट कार्यालयात पोस्टमन व वितरण प्रणालीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे कार्य शिबीर डाक अधिक्षक यांचे उपस्थितीत घेण्यात आले. “ढाई आखर पत्र लेखन” स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत जिल्ह्यातील विविध 75 शाळांना भेटी देण्यात आल्या, यात 3,151 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन “नए भारत के लिए डिजीटल इंडिया” या विषयावर आपले निबंध सादर केले.
यावर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. या सप्ताहास जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग मयुरेश कोले यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील सर्व डाक कर्मचारीयांनी या सप्ताहात आपले योगदान दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त केले. डाक विभागाच्या अश्याच नवनवीन योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपने पोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग तत्परतेणे काम करीत राहील अशी ग्वाही यावेळी अधिक्षक डाक विभाग यांच्यामार्फत देण्यात आली.