
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या मुख्य रस्त्यासमोरच असलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे ठिकाण असून येथे दररोज प्रवासी ये-जा करत असतात. अनेक पर्यटकही रेल्वेनेच येतात. मात्र, स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या या खड्ड्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना हा खड्डा चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचाही धोका वाढतो.
स्थानिकांच्या मते, हा खड्डा अनेक दिवसांपासून आहे. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही तात्काळ कार्यवाही केली जात नाही. या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर यावर त्वरित कारवाई झाली नाही तर या खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोणत्याही संभाव्य अपघाताची जबाबदारी बांधकाम विभागाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.