
सावंतवाडी : ठेकेदारान शहरासह बाजारपेठेत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पालिकेला जनक्षोभाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर खड्डेमय रस्ता पुन्हा एकदा दुरूस्त करण्यात आला. मात्र, हे काम पुन्हा करताना ठेकेदाराकडून 'धुळधाण' उडवून देण्याचा प्रकार घडला. डांबर कमी अन् ग्रीड जास्त वापरल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाला धुळीच्या साम्राज्यात रहावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी वर्गान मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत त्यांना चांगलेच धारेवर धरलं.
नगरपरिषदेत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना संतप्त व्यापारी, नागरिकांनी याबाबत फैलावर घेतल. ४० वर्षांत सावंतवाडीत जे घडलं नाही ते आज घडत आहे. निकृष्ट दर्जाच काम करून बीलाचे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा तसाच प्रकार केला आहे. ठेकेदार आणि पालिका प्रशासनाचे जबाबदार लोक जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहेत. काम सुरू असताना पालिकेचे सुपरवायझर त्याठिकाणी हजर नसतात. केवळ मलिदा खाण्याच काम ठेकेदाराकडून होत असून याला पालिकेच्या अधिकाऱ्यांची साथ असल्याचा गंभीर आरोप यावेळी उपस्थितांनी केला. डांबर वापरलं असं म्हणणारे टक्केवारीत भागीदार आहेत असाही आरोप केला. तसेच शालेय विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांना धुळीचा होणारा त्रास येऊन बघा असे खडेबोल सुनावत उपस्थितांनी मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरलं.
दरम्यान, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच लक्ष मतदारसंघात नाही. प्रशासनावर कुणाचा अंकुश राहीलेला नाही. त्यामुळेच हा अंदाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप उबाठा शिवसेना उप जिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी केला. तसेच धुळीच्या साम्राज्यातून व्यापारी वर्गाची मुक्तता न केल्यास संपूर्ण बाजारपेठे बंद ठेवून व्यापाऱ्यांसह नगरपरिषदेच्यासमोर बसणार असा इशारा दिला. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी उपस्थितांच्या भावना ऐकून घेत आज रात्री बाजारपेठ बंद झाल्यावर रस्त्यावरील ग्रीड बाजूला काढू, धुळीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन उपस्थितांना दिले. त्यासंदर्भात बांधकाम अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, राष्ट्रवादी श.प.चे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उबाठा शिवसेना शहराध्यक्ष शैलैश गवंडळकर, निशांत तोरसकर, मनसे तालुकाध्यक्ष अॅड. राजू कासकर, व्यापारी संतोष मुंज, सुधीर पराडकर, संजय नार्वेकर, जगन्नाथ केनवडेकर, प्रसाद वागळे, किशोर वागळे, राजा वाडकर आदी बाजारपेठील व्यापारी उपस्थित होते.