
सिंधुदुर्गनगरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत तसेच हा महामार्ग ११ वर्ष अपूर्ण आहे, या विरोधात आज कुडाळ हुमरमळा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, बाबुराव धुरी, सुशांत नाईक यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. मात्र माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार राजन तेली यांची अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
काल झालेल्या वैभववाडी येथील रास्तारोको आंदोलनाला माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. मात्र आज वैभव नाईक यांच्या आंदोलनात ते उपस्थित नव्हते. तर काल झालेल्या वैभववाडी येथील आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक हे उपस्थित नव्हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये बिनसलं की काय ? आंदोलनाला एकत्र येणं टाळलं ? असा सवाल उपस्थित होतोय. आता यावर हे दोन्ही नेते काही बोलतील की चुप्पी बाळगतील हे पाहावं लागेल. आधीच विरोधकांकडून निवडणूकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे, सतत पक्ष संघटनेला लागलेली गळती त्यात सिंधुदुर्गाच्या ठाकरे शिवसेनेतील या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जर आलबेल नसेल तर आगामी निवडणुकात याचे काय परिणाम उमटतील हे येणारा काळचं सांगेल.