कणकवलीतील 'त्या' सेलवरून राजकीय घमासान

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 10, 2023 21:02 PM
views 196  views

कणकवली : कणकवलीतील 'त्या' सेलचे उदघाटन माजी नगरसेविका मेघा गांगण यांनी केले, नाहरकत दाखला नगरपंचायत ने दिला आणि आमदार राणे स्टाईल ने तो सेल बंद पाडतात. त्या सेल  बाबत कणकवली तालुका व्यापारी संघटना जी भूमिका घेईल त्यासोबत शिवसेना उबाठा असणार आहे. मात्र, आमदार नितेश राणेंची दबंगगिरी खपवून घेणार नाही. आमदार नितेश राणेंनी तिरंगी भूमिकेत राहू नये अशी टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

कणकवली शहरातील लक्ष्मी विष्णू हॉल मध्ये सुरू असलेल्या सेल मुळे आपले आर्थिक नुकसान होत आहे असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी बुधवारी आमदार नितेश राणेंनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती.

त्यानंतर गुरुवार पासून हा सेल बंद झाला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना सुशांत नाईक म्हणाले की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत प्रतिवर्षी सेल असतो. त्यातून गोरगरीब ग्राहकांना कमी पैशात जास्त वस्तूंची मनसोक्त खरेदी करता येते. कणकवली तालुका व्यापारी संघटनेनेला आदर्श इतिहास आहे. कायदेशीर रीत्या या सेलवर प्रशासनाकडे दाद मागावी. मात्र आमदार नितेश राणेंची दबंगगिरी चुकीची आहे. असही ते म्हणाले.

 राणेंचे हे दबंगगिरी स्थानिक व्यापाऱ्यांवर बुमरँग होईल , आमदारांची भूमिका चुकीची आहे असे नाईक म्हणाले. कन्हैया पारकर यांनी आमदार नितेश राणेंवर टीका करताना तुमच्याच माजी नगरसेविकानी त्या सेल चे उदघाटन केले. मग ज्या सेल चे उदघाटन तुमच्याच पक्षाच्या माजी नगरसेविका करतात तो सेल तुम्ही दंबग स्टाईल ने बंद पडून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान का करता ? असा सवालही पारकर यांनी केला. यावेळी तेजस राणे, महेश कोदे उपस्थित होते.