
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी तब्बल २१, तर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार लक्ष्मण कसेकर यांनी दिली. विशेष म्हणजे, तालुक्यात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामासाठी ओळखल्या जाणाऱ्या माटणे जिल्हा परिषद गटासाठी सर्वाधिक १२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून, या गटातील लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने राजकीय वर्तुळात शांतता होती. मात्र बुधवारी शेवटच्या दिवशी चित्र पूर्णपणे बदलले. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची तहसील कार्यालयात एकच झुंबड उडाली. अखेरच्या क्षणापर्यंत चाललेल्या हालचालींमुळे निवडणूक वातावरण तापले. अचानक वाढलेल्या नामनिर्देशनांमुळे दोडामार्ग तालुक्यातील निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील टप्प्यात माघारी आणि प्रचाराच्या रणधुमाळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीधर्मानुसार निवडणूक लढवणार : गणेशप्रसाद गवस
वरिष्ठ नेत्यांनी भाजपा व शिंदे शिवसेना अशी युती झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युती धर्मानुसार तालुक्यातील आम्ही निवडणूक लढवत आहोत. तसेच अनेक कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर केली जाईल असे शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गात स्वबळावर : बाबुराव धुरी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा स्वबळावर लढवत आहोत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील १७ जिल्हा परिषद व पंचायत समिती जागा लढविण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ठाकरे शिवसेना सत्ता स्थापन करील, असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केला आहे.
तिसरी आघाडी हीच ती : एकनाथ नाडकर्णी
संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. या निवडणुकीत दोडामार्गसाठी आम्ही संघर्ष करून उमेदवारांना विजयी करू. यासाठी दोडामार्ग विकास आघाडी ही तिसरी आघाडी झाली असेच समजा, असा सूचक इशारा भाजपाचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला आहे. पोरकट पणा आम्हाला सहन होणार नाही, पक्षाने तिकीट नाकारले याच कुठे तरी खंत आहे. असो मात्र आमचे सर्व अपक्ष उमेदवार विजयी होतील हे निश्चित.
नाराजी वरिष्ठ दूर करतील : दीपक गवस
वरिष्ठांनी महायुतीचा फॉर्म्युला ठरवला आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढविणार आहे. येथील ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज असले तरीही त्यांची नाराजी वरिष्ठ नेते लवकरच दूर करतील, असे भाजपाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी स्पष्ट केले.
सक्षम उमेदवार रिंगणात : संजय गवस
सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. जिल्हा परिषद साठी जरी मी व बाबुराव धुरी यांनी अर्ज भरला असला तरीही वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्यातील एकाचे नाव मागे घेतले जाईल. मी तालुकाप्रमुख असल्याने येथील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जिंकवून आणण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस यांनी स्पष्ट केले.
36 वर्षापूर्वी कमळ दोडामार्गात फुलवले : राजेंद्र म्हापसेकर
भाजपासाठी मी मागील गेल्या 35 वर्षापासून एकनिष्ठ तिने काम करत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जिल्ह्यात भाजप नामशेष होत असताना येथील पहिल्याच पंचायत समितीवर निर्विवाद विजय मिळवून भाजपाचा सभापती म्हणून मी बसलो होतो व त्यानंतर सुद्धा भाजपाचा उमेदवार सभापती म्हणून बसवला होता. पक्षाने मला अद्यापही डावलले नाही व मी अजूनही भाजपचाच कार्यकर्ता आहे. भाजपाने अद्यापही उमेदवारी न भरण्यासंदर्भात मला कोणत्याही प्रकारच्या सूचना केलेल्या नाहीत. माटणे मतदार संघातील जनतेने मला निवडणुकीत उतरण्याचा आग्रह केल्याने मी पक्षातर्फे व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र दोडामार्गात 35 वर्षा पूर्वी कमळ फुवलं आणि ते प्रत्येक घरा घरात मना मनात फुलवले असे म्हणून म्हापसे कराना अश्रू अनावर झाले.
माटणे गटात तब्बल १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील चुरस नक्कीच वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदार संघात भाजपाचे राजेंद्र म्हापसेकर, दीपक गवस व एकनाथ नाडकर्णी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर ठाकरे शिवसेनेचे संजय गवस व बाबुराव धुरी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे यापैकी कोण आपले नाम निर्देशन पत्र मागे घेतो? कोणाला उमेदवारी मिळणार? पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने कोण बंडखोरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.










