सामाजिक बांधिलकीच्या टीमसह पोलिसांची कार्यतत्परता

बेशुद्ध पडलेल्या वृद्धाला सुखरूप पोहचवलं घरी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 24, 2024 05:48 AM
views 162  views

सावंतवाडी : शहरातील बाहेरचावाडा येथे आकेरी गावातील नामदेव तोरस्कर ही वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या बाजूला  बेशुद्ध अवस्थेमध्ये पडून होती. दारूच्या नशेत ही व्यक्ती पडली असेल असा काहींचा समज झाला होता. मात्र, ही वृद्ध व्यक्ती फिट येऊन पडली होती. याची कल्पना सायंकाळी इम्तियाज राजगुरू यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना दिली. त्यांनंतर या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन प्राथमिक उपचार करून त्या वृद्धाला शुद्धीवर आणले. 

ही व्यक्ती आकेरी येथील असल्याचे समजले. कामावर जात असताना फिट येऊन पडल्याच ते म्हणाले. त्यांच्या हाता पायाला मार लागला होता. यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बिट हवालदार पि.के कदम यांना कल्पना दिली असता त्यांनी लगेच पोलिस अनिल धुरी व डुमिंग डिसोजा यांना घटनास्थळी पाठविले. पोलीस धुरी यांनी वृद्ध व्यक्तीला गाडीमध्ये बसून आकेरी येथे त्यांच्या राहत्या घरी सुखरूप सोडले. मदतकार्याबद्दल वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच  पोलीस कर्मचाऱ्यांनी ही सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. यासाठी विशेष सहकार्य विशाल नाईक, श्री. कादर व आजान नाईक यांनी केले.