पोलीस जगदीश दूधवाडकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 12:14 PM
views 60  views

सावंतवाडी : गुरूवारी रात्री सातच्या सुमारास सावंतवाडी आरोग्य भुवनच्या मागे एक वृद्ध व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. याची कल्पना सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना मिळताच ते व अशोक पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच सावंतवाडी पोलीस ठाण्यात फोन केला असता घटनास्थळी पोलीस जगदीश दूधवाडकर दाखल झाले.

या वृद्धाची अवस्था फार गंभीर होती.  यावेळी खाकी वर्दीतील त्या पोलीस अधिकाऱ्याने देवदुताचे दर्शन घडवले व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या वृद्धाला आंघोळ घालण्यास मदत केली. आंघोळ घालून स्वच्छ केल्यानंतर सामाजिक बांधिलकीचे अशोक पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अखिलेश कोरगांवकर यांनी त्या वृद्धासाठी नवीन कपडे आणून घातले. तर माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी विनामूल्य ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली.  त्या ॲम्बुलन्सने या वृद्धरुग्णाला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या वृद्धाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्या वृद्धाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळा कुडतरकर व आरोग्य भवनचे मालक श्री. तुळसकर यांचे सहकार्य लाभले.